आवाहन  |
 छत्रपती शिवरायांचे अस्सल चित्र
छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात स्थापलेले स्वराज्य ही
 श्री शिवरायांची राजमुद्रा
सर्व जगाच्या इतिहासातील एक अद्वितीय घटना आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परकीय, अत्याचारी सुलतानशाह्यांना मराठी तलवारीचे पाणी पाजून शिवरायांनी स्वराज्यस्थापना केली ती प्राणार्पणास सिद्ध झालेल्या निष्ठावान अनुयायी आणि सह्याद्री-सागरातील दुर्गम किल्ल्यांच्या सहाय्याने.
काळाच्या ओघात जीर्ण होऊन चाललेले हे शिवदुर्ग आजही शिवरायांची गाथा व मराठ्यांच्या पराक्रमांच्या कथा सांगत कसेबसे उभे आहेत.
महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, इथल्या लोकांचे ह्या भूमीवरील प्रेम, त्यांची देवदैवते आणि जीवित वित्ताचे रक्षण करण्यास अवतार स्वरूपी शिवरायांना साथ देणारे किल्ले ही आपली खरी तीर्थक्षेत्रे आहेत. अनेक ज्ञातअज्ञात मराठी मावळयांचे रक्त ह्या किल्ल्यांच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी सांडलेले आहे. मराठी माणसासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतातील लोकांसाठी ही अतिपवित्र स्थाने आहेत.
शिवरायांच्या शेकडो किल्ल्यांपैकी रायगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंहगड, पुरंदर, सिंधुदुर्ग, तोरणा, राजगड ह्या किल्ल्यांना जणू अनेक देवस्थानापैकी बारा ज्योतिर्लिंगाप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रतापगड ह्यामध्ये अग्रस्थानी आहे.
आपल्या ज्वलंत इतिहासाची स्मृती जागवणारी व मनाला नवी प्रेरणा, उभारी देणारी ही दुर्गस्थाने नीट जपून हा वारसा पुढच्या पिढीकडे सुस्थितीत पोहोचविणे हे आपले कर्तव्य ठरते.
हे कर्तव्य पार पाडण्याची संधी प्रतापगड जीर्णोद्धार कार्यामुळे आपणा सर्वांना मिळत आहे. आबालवृद्धांना ठाऊक असलेल्या प्रतापगडावर सध्या पुनर्बांधणी व जीर्णोद्धाराचे कार्य सुरू झालेले आहे. आवश्यक ती कायदेशीर संमती, परवानगी व ना-हरकती मिळवून, धर्मादाय आयुक्तांकडे संस्था रितसर नोंदवून प्रतापगडावरील ग्रामस्थांच्या सहकार्याने हे कार्य चालू झाले आहे.
 प्रतापगडावरील श्री तुळजाभवानी
प्रतापगड पुन्हा सुस्थितीत आणणे हे कार्य अशक्य नसले तरी प्रचंड आवाक्याचे, खर्चाचे व अनंत अडचणींचे असे आहे. पण लोकवर्गणी व लोकसहभागातून हे कार्य निश्चित पूर्ण होणार हा संस्थेचा विश्वास आहे.
प्रतापगडासारख्या महत्त्वाच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार लोकसहभागातून होत आहे. ही घटना महाराष्ट्रात प्रथमच घडत आहे. हे जीर्णोद्धार कार्य होत असताना आपला सहभाग व सहकार्य मिळाले तर ते आपल्यालाही अभिमानास्पदच आहे. प्रतापगड जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन इथे आम्ही करीत आहोत.
महाराष्ट्राचे दैवत असणार्या शिवरायांबद्दलची आपली भक्ती व आदर, महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाबद्दल आपल्याला वाटणारा अभिमान आणि मराठ्यांच्या कर्तृत्वाचा आपल्या मनात असलेला गर्व खरोखरच खरा व अस्सल आहे हे प्रतापगडाला त्याचे वैभव पुन्हा प्राप्त करून देऊन आपण दाखवून देऊया. प्रतापगडावरील शिवरायांनी स्थापलेली श्रीभवानी शेकडो वर्षे अशा कार्यांना आशीर्वाद देतच आहे.
|
| आपण प्रतापगड बनवू तसा । शिवकाळात, वैभवात होता जसा ।। |
| जय भवानी । जय शिवराय ।। |
|
| |
Copyright © pratapgad.in | All rights reserved.
Designed and developed by Dnyandeep Infotech Pvt. Ltd., Sangli.
|